Type Here to Get Search Results !

पालघर जिल्ह्यातही दुष्काळ जाहीर करा; खासदार डॉ. हेमंत सवरा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी







पालघर, २९ सप्टेंबर: राज्य शासनाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, त्यामधून पालघर व ठाणे जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. या निर्णयाकडे लक्ष वेधत, पालघर जिल्ह्यालाही इतर जिल्ह्यांप्रमाणे दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करावे, अशी आग्रही मागणी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

- मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात खासदार डॉ. सवरा यांनी जिल्ह्याच्या पर्जन्यमानाबाबतची वस्तुस्थिती मांडली आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे की:

- पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा काही अधिक पाऊस झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसत असले तरीही ती आकडेवारी फसवी आहे. संपूर्ण हंगामातील बहुतांश पाऊस केवळ जुलै महिन्यातच पडला आहे.

- जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे भात पेरणीला विलंब झाला.

- जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत आणि तिसऱ्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीजन्य पावसामुळे पर्जन्यमानाची आकडेवारी समाधानकारक वाटते.

- प्रत्यक्षात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेक तालुक्यांमध्ये शून्य ते १० मिलिमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

- सध्या बहुतांश ठिकाणी भातपीक हिरवेगार दिसत असले तरी, प्रत्यक्षात दाणा भरण्याच्या स्थितीत पीक असताना पाऊस झालेला नाही.

- सप्टेंबरच्या मध्यापासून तापमानात कमालीची वाढ झाल्याने जमिनीतील पाणी सुकून भातपीक धोक्यात आले आहे.

- राज्य शासनाने यापूर्वीच सर्व बाधित क्षेत्रांमधील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची आठवण करून देत डॉ. सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांच्या सद्यस्थितीचे आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने मारलेल्या दडीचे पुन्हा सर्वेक्षण करण्याची विनंती केली आहे. या सर्वेक्षणाअंती पालघर जिल्ह्यालाही दुष्काळग्रस्त जाहीर करून येथील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments