Type Here to Get Search Results !

परतीच्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरित सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत द्या - खासदार डॉ. हेमंत सवरा,






       

ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये २६, २७ आणि २८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांचे संपूर्ण तयार झालेले भातपीक पाण्याखाली गेले असून, त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. 

पालघर जिल्ह्यातील एकूण १.०७ लाख हेक्टर खरिप क्षेत्रापैकी ७६ हजार हेक्टर क्षेत्र भातपिकाखाली आहे. या पिकावरच बहुतांश शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. यावर्षी आधीच ४६,५६३ शेतकरी बाधित ठरले असून शासनाने १२ कोटी ४० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती. तथापि, नव्या अवकाळी पावसाने पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे सदर मदत तुटपुंजी प्रमाणात ठरली आहे.

पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील अनेक भागांत कापणीस तयार असलेले गरव्या जातीचे भातपीक पूर्णपणे आडवे पडले आहे. तयार झालेल्या भाताच्या कोंब मधील दाणा काळा पडला आहे व भाताच्या कोंबाला मोड आले असून शेतात सुकवण्यासाठी ठेवलेला भात ओला होऊन कुजला आहे, अनेक गावांतील कडपे वाहून गेली आहेत आणि व्यापाऱ्यांकडून या पिकाची खरेदी होण्यास गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

आता पुन्हा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात कापणीला आलेले तसेच साठवलेले भातपीक पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे.

सध्या शेतामध्ये उभे असलेले गरवे भातपीक कापणीच्या कालावधी पलीकडे गेले असून, अतिवृष्टीमुळे भातपिकावर बगळ्या, खोडकीडा, करपा, फुलोरा कमी होणे अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे उत्पादन व गुणवत्ता दोन्ही मोठ्या प्रमाणात घटले आहेत.

या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस , कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे,आणि पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री मा. श्री. गणेश नाईक यांच्याकडे तात्काळ मदतीसाठी लेखी मागणी केली आहे.


डॉ. हेमंत सवरा यांनी त्यांच्या पत्राद्वारे पुढील तातडीच्या मागण्या मांडल्या आहेत:

तातडीने पंचनामे: ठाणे व पालघर जिल्ह्यांतील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांचे तात्काळ सरसकट पंचनामे करण्यात यावेत.

आर्थिक मदत:  बाधित शेतकरी व नागरिकांना त्वरित भरघोस आर्थिक मदत पुरवावी.

आपत्ती व्यवस्थापन निधीचा वापर: आवश्यक तरतुदी करून मदतकार्य जलदगतीने सुरू करण्यात यावे.



Post a Comment

0 Comments