Type Here to Get Search Results !

कुपोषित बालकांच्या पोषणाची जबाबदारी आता अधिकाऱ्यांच्या खांद्यावर!

 

कुपोषित बालकांच्या पोषणाची जबाबदारी आता अधिकाऱ्यांच्या खांद्यावर!




आयएएस अधिकारी मनोज रानडे यांच्या पुढाकारातून 65 बालक दतक 

प्रतिनिधी (पालघर) : कुपोषणाच्या समस्येवर केवळ शासकीय योजना राबवून न थांबता, कुपोषित बालकांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याची प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा परिषद पालघरने हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मनोज रानडे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील 65 कुपोषित बालकांना अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दत्तक घेण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचा उद्देश केवळ बालक दत्तक घेणे नसून, त्याच्या आरोग्याची नियमित देखरेख, पोषणस्थितीत सुधारणा आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडवून आणणे हा आहे.या उपक्रमातून प्रशासकीय जबाबदारीला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा प्रयत्न झाला असून, स्वतः वरिष्ठ अधिकारी म्हणून पुढाकार घेत इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेणाऱ्या मनोज रानडे यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. ‘एक अधिकारी–एक कुपोषित बालक’ या भावनेतून सुरू झालेल्या या प्रयत्नामुळे कुपोषणमुक्तीच्या लढ्याला प्रशासनाची प्रत्यक्ष साथ मिळत आहे.

 ‘सेवा संकल्प अभियानाच्या’ माध्यमातून मनोज रानडे यांनी सफाळे येथील ठाणेपाडा अंगणवाडीतील हार्दिक निलेश परेड या बालकाच्या घरी भेट देऊन त्याच्या आरोग्य व पोषणस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. बालकाचे वजन, उंची, नियमित पोषण आहार, आरोग्य तपासणी आणि जंतनाशक औषधाबाबत त्यांनी संबंधितांकडून माहिती घेतली.हार्दिकच्या पोषणात आवश्यक सुधारणा व्हावी यासाठी अंडी व दूध उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असून, पुढील सहा महिन्यांत त्याच्या पोषणस्थितीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच  



कुपोषणाचा प्रश्न केवळ बालकाच्या आहारापुरता मर्यादित नसून कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही त्यामागे महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे हार्दिकच्या आरोग्याची पाहणी केल्यानंतर रानडे यांनी त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचीही माहिती घेतली.कुटुंबाकडे असलेली जमीन, भातशेती, पालेभाज्यांची लागवड आणि उत्पन्नाची साधने याबाबत माहिती घेण्यात आली. कुटुंबाच्या गरजेनुसार घरघंटी, शिलाई मशीन, पोल्ट्री शेड, कुक्कुटपालन, पशुपालन आदी उपजीविकेच्या योजनांचा लाभ मिळवून देता येईल का, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. कुटुंबाचे उत्पन्न वाढल्यास बालकाच्या पोषणाचीही अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेता येईल, या उद्देशाने पात्र योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.यानंतर रानडे यांनी धनश्री पिंटू ठाकरे या कुपोषित बालिकेच्या घरीही भेट देऊन तिच्या आरोग्याची आणि कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती घेतली. कुपोषित बालकांच्या कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार शासकीय योजनांशी जोडून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

..... अधिकाऱ्यांच्या मनात रुजवली सामाजिक बांधिलकी.........

 पालघर जिल्ह्यातील 65 बालकांना दत्तक घेण्याची प्रक्रिया करून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे सोपविणे हा केवळ प्रशासकीय उपक्रम न राहता, ‘कुपोषित बालक माझीही जबाबदारी’ ही सामाजिक भावना रुजविण्याचा प्रयत्न ठरत आहे. आयएएस अधिकारी म्हणून प्रशासनाची धुरा सांभाळताना मनोज रानडे यांनी कुपोषणाच्या प्रश्नाकडे मानवी संवेदनशीलतेने पाहत अधिकारी वर्गालाही या सामाजिक उपक्रमाशी जोडले आहे, ही या उपक्रमाची विशेष बाब ठरली आहे.शनिवारी बालक घेतेवेळी  सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व्यंकटराव हुंडेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तनवीर शेख, अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका, ग्रामपंचायत अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments