दिल्लीच्या जंतर-मंतर येथे विद्यार्थी आणि युवाशक्तीने केलेल्या ऐतिहासिक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या अभूतपूर्व विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि NEET पेपर लीक प्रकरणात बळी गेलेल्या 21 विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे विरार येथे भव्य कॅण्डल मार्च व विजय जल्लोष साजरा करण्यात आला.
मधुरम हॉटेल ते विवा कॉलेज पर्यंत काढण्यात आलेल्या या कॅण्डल मार्चमध्ये शेकडो विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. विवा कॉलेजच्या बाहेर दिवंगत 21 विद्यार्थ्यांना मेणबत्ती लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर लोकशाहीच्या विजयाचा विजय जल्लोष मोठ्या उत्साहात करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी यांनी सर्वप्रथम जंतर-मंतरच्या आंदोलनासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या देशातील सर्व युवा पिढीचे तसेच कोक्रोच जनता पार्टी आणि त्याचे नेतृत्व करणारे श्री.अभिजीत दीपके यांचे मनापासून अभिनंदन केले.
ते म्हणाले, "युवाशक्तीने दाखवलेला हा उत्साह आणि निकराचा लढा हाच या मोठ्या विजयाचे कारण आहे. आजची युवाशक्ती ही फक्त मोबाईलपुरती मर्यादित नाही. ती रस्त्यावर उतरली की देशाची सत्ता आणि खुर्चीही हालवून टाकण्याची ताकद ठेवते. हे आज जंतर-मंतरच्या आंदोलनाने देशाला दाखवून दिले आहे."
कॅप्टन पेंढारी यांनी सरकारकडे 3 प्रमुख मागण्या देखील केल्या:
1. आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पालकांना 1 कोटी रुपयांची भरपाई तात्काळ देण्यात यावी.
2. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गन हल्ल्यासाठी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
3. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आले सर्व खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
पुढे कॅप्टन पेंढारी म्हणाले, "लोकसभा विरोधी पक्षनेते आदरणीय राहुल गांधी यांनी 'विद्यार्थी, छात्र की गुंज' या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांसाठी जो लढा उभा केला, त्याचेच हे मोठे यश आहे."
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते ओनील अल्मेडा, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिनेश कांबळे, काँग्रेस नेते किरण शिंदे, माजी सैनिक अब्बास फौजी, कम्युनिस्ट पक्षाचे शेरू वाघ, काँग्रेसचे नेते संदीप कनोजिया, सोहेल खान, भीमराव पेठकर,सुनीता आहेर, रफिक शेख, साजिद सय्यद, रतन तिवारी, रामदास वाघमारे, सुनिलकुमार यादव, प्रदीप कनोजिया,मनोज कनोजिया,अशोक शर्मा, जयेंद्र कदम, आनंदा बावस्कर,सतीश तांबे, रासपचे नितीन पेंढारी,समाजवादी पक्षाचे अवदराज यादव, कुमार राऊत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी जंतर-मंतरच्या विजयाचा जल्लोष म्हणून सर्व उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना MELODY चॉकलेट वाटून हा विजय साजरा करण्यात आला.
शेवटी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर करण्यात आले की, मोदी सरकारच्या शिक्षण विरोधी चुकीच्या धोरणांचा आम्ही सातत्याने निषेध करत राहू आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ही लढाई अधिक तीव्र करू.


Post a Comment
0 Comments