पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी पश्चिम रेल्वे विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी व प्रलंबित रेल्वे थांब्यांच्या मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीश कुमार यांना तीन महत्त्वपूर्ण निवेदने सादर केली आहेत.
खासदार डॉ. सवरा यांनी आपल्या निवेदनांमध्ये खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत :
1. उधना विशेष (गाडी क्र. 09055/56) ही गाडी दररोज चालविण्याची मागणी.
o कुंभमेळा निमित्ताने तात्पुरती सेवा सुरू करण्यात आली होती. आता ती नियमित करण्यात यावी, अशी प्रवाशांची मागणी त्यांनी मांडली आहे.
2. अंधेरी-डहाणू रोड सायंकाळची लोकल सेवा सुरू करावी, जेणेकरून अंधेरी ते डहाणू प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा त्रास होणार नाही.
3. पहाटे ४ वाजताची डहाणू रोड -चर्चगेट लोकल सुरू करावी.
4. सायंकाळी डहाणू-विरार लोकल (६.०० ते ६.१५ वा.) व विरार-डहाणू रोड लोकल (५.३० ते ६.०० वा.) सुरू कराव्यात, जेणेकरून प्रवाशांच्या गर्दीचा ताण कमी होईल.
5. विरार-डहाणू मार्गावर १५ डब्यांच्या ईएमयू गाड्या सुरू करण्याची मागणी.
तसेच, पालघर स्थानकावर प्रलंबित असलेल्या खालील गाड्यांच्या थांब्यांसाठीही खासदार डॉ. सवरा यांनी पाठपुरावा केला आहे :
• 12935/12936 बांद्रा-सूरत इंटरसिटी एक्सप्रेस
• 20941/20942 बांद्रा-गाझीपूर एक्सप्रेस
याशिवाय, नवीन थांबे मंजूर करण्यासाठी खालील गाड्यांची मागणी करण्यात आली आहे :
• 20495/20496 जोधपूर-हडपसर (पुणे) एक्सप्रेस
• 12971/12972 बांद्रा-भावनगर एक्सप्रेस
डॉ. सवरा यांनी नमूद केले आहे की, पालघर जिल्हा वेगाने विकसित होत असून येथे वाढवन बंदर, पालघर विमानतळ, वसई-विरार-पालघर सागरी महामार्ग आणि मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवे यांसारखी मोठी प्रकल्पे सुरू आहेत. त्यामुळे पालघर स्थानकावर शताब्दी एक्सप्रेस (12009/10 मुंबई-अहमदाबाद) याचा नियमित थांबा देणे अत्यावश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी रेल्वे बोर्डास पाठविलेल्या या निवेदनांद्वारे पालघर जिल्ह्यातील प्रवाशांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांना न्याय मिळावा आणि रेल्वेसेवा सुलभ, सुरक्षित व सर्वसमावेशक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment
0 Comments