Type Here to Get Search Results !

विरार-नालासोपारा लिंक रोडमुळे जलद प्रवासातून वेळेची बचत

 



विरार - वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील विरार आणि नालासोपारा या दोन रेल्वे स्थानकांपासून अगदी जवळ असणारा हा लिंक रोड झाल्यामुळे या दोन स्थानकांना जोडणाऱ्या पश्चिम बाजू जवळ आल्या आहेत. वसई- विरार महानगरपालिकडून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. वसई-विरार शहराची लोकसंख्या वेगाने वाढत असून या शहराची अंतर्गत वाहतूक सुधारावी यासाठी नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून अनेक रस्ते तसेच रिंगरूट प्रस्तावित आहेत. विरार नालासोपारा लिंक रोड झाल्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला चालना मिळून प्रवास आणखील सुलभ झाला.


आज या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत असून यात नोकरीनिमित्त प्रवास करणारे, कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिला, शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, दोन्ही स्थानकांदरम्यान असणाऱ्या भाजी मंडईमुळे भाज्यांची वाहतूक करणेही यामुळे सोपे झाले आहे. तसेच हा रस्ता झाल्यानंतर रिक्षा चालकांकडून मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त करण्यात आला. याआधी या दोन स्थानकातील पश्चिम बाजूला जाण्यासाठी बोळींज मार्गे जावे लागत होते. मात्र ते अंतर अधिक असल्याने प्रवाशांचा वेळ वाया जात असे तसेच संध्याकाळच्या वेळी अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असे. आता थेट सरळ असणारा दुपदरी रस्ता झाल्यामुळे इथली वाहतूक जलद झाली आहे तसेच त्यामुळे इंधनाची देखील बचत होत आहे.


विरार पश्चिमेच्या जकात नाका परिसरातून सुरु होणारा हा रस्ता नालासोपारा पश्चिमेच्या लक्ष्मीबेन छेडा मार्ग येथे संपतो. म्हाडा वसाहत तसेच अनेक रहिवासी संकुलातून जाणारा हा रस्ता झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना देखील दोन्ही स्थानकांकडे प्रवास करणे सोयीचे झाले आहे. या दोन्ही स्थानकांदरम्यान आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणावर विकास कामे होत असून हा लिंक रोड झाल्यामुळे वसई-विरार शहराची अंतर्गत वाहतूक गतिमान होण्यास चालना मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments