Type Here to Get Search Results !

*वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याला यश, चिंचोटी- भिंवडी मार्गाच्या दुरूस्तीचा मार्ग मोकळा*

 



 


वसई आणि भिवंडी तालुक्याला जोडणाऱ्या चिंचोटी ते भिवंडी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधा-वापरा-हस्तांतरीत या तत्वावर मे. सुप्रीम वसई भिवंडी टोलवेज प्रा.लि. या कंपनीला देण्यात आला होता. सदरहू कंपनीकडून या रस्त्याची नियमित देखभाल व दुरूस्ती न केल्याने हा संपूर्ण रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. वसई तसेच भिवंडी परिसरातील मोठ्याप्रमाणावर  असलेल्या उद्योग धंद्यांच्या मालाच्या दैनंदिन वाहतूकीसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे.


                त्याचप्रमाणे चिंचोटी-पोमण-कामण या परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासीपाडे असून दैनंदिन वाहतूकीसाठी त्यांच्याकरीता हा एकमेव रस्ता आहे. मागील काही वर्षात या रस्त्यावर खड्डयांमुळे तेथील नागरिकांना पायी चालणे सुध्दा कठीण होत असून वाहतूकी मध्ये येणाऱ्या वारंवार अडथळ्यांमुळे उद्योग धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे. 



या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत.वसई विधानसभेच्या संघर्षकन्या आमदार  स्नेहा दुबे पंडित यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेच्या डिसेंबर 2024 च्या हिवाळी अधिवेशनात या रस्त्याच्या दुरूस्तीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते व शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. 



             चिंचोटी- भिवंडी रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रकिया सुरू केली होती. तथापि, या अगोदर काम दिलेल्या मे. सुप्रीम वसई भिवंडी टोलवेज प्रा.लि. या कंपनीने शासनाच्या या निविदा प्रक्रियेबाबत न्यायालयात धाव घेतल्याने मागील वर्षभरापासून या रस्त्याच्या दुरूस्ती अथवा काँक्रीटीकरणाचे काम करता येत नव्हते. 


              यासंदर्भात आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मा. ना.देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री यांनी तातडीने दिलेल्या आदेशानुसार, मा. ना. शिवेंद्र राजे भोसले साहेब, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासोबत दि. 16 एप्रिल 2025, दि. 11 जुलै 2025 व दि. 12 ऑगस्ट 2025 या दिवशी आमदार  स्नेहा दुबे पंडित यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्रालयामध्ये बैठका घेण्यात आल्या. 


या सर्व बैठकामध्ये, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सुप्रिम कंपनी यांच्यामध्ये समन्वय होत नसल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत ही बाब मा. न्यायालयासमोर मांडून कोणत्याही परिस्थितीत या रस्त्याच्या कामाला सुरूवात करावी अशी मागणी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केली. 


उपरोक्त बैठकीत मा. ना. शिवेंद्र राजे भोसले साहेब, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले निर्देश व त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे मांडलेली बाजू याचा परिणाम होऊन मा. न्यायालयाने दि. 26/08/2025 रोजी या रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यास परवानगी दिली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील काही दिवसात रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. 


वसईकरांच्यावतीने दैनंदिन जीवनाशी निगडीत अश्या महत्वाच्या आणि बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रश्नावर वैयक्तिक लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार  स्नेहा दुबे पंडित यांनी मा. ना.देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री तसेच मा. ना. शिवेंद्र राजे भोसले साहेब, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे आभार मानले आहे.


Post a Comment

0 Comments